माझं आयुष्यभराचं व्यसन..📚📚
किताबें.. पुस्तके.. माझं आयुष्यभराचं व्यसन. अगदी लहानपणीच आईच्या साक्षीने सुरू झालेले हे व्यसन. साधारण तीन साडेतीन वर्षाचा असेल तेव्हा आईसोबत शाळेत जायचो. आई ग्रंथपाल असल्यामुळे पुस्तकाच्या सानिध्यात दिवस जात होता. पण फक्त पुस्तक उघडून चित्र तरी किती दिवस पाहणार आणि एका ठराविक काळानंतर मला ते काम खूप रटाळ वाटू लागलं म्हणूनच की काय मी वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत जाण्याआधीच वाचायला शिकलो.(आजची मराठी शाळेची स्थिती पाहून हे खोटं वाटत बऱ्याच वेळेला) पण हो मी शाळेत जाण्याआधी पुस्तकात रमायला शिकलो.आणि इतकं रमलो की पुस्तकाबद्दल असलेलं माझं प्रेम दिवसागणिक वाढत गेलं पण कमी नाही झालं. असं म्हणतात की 'पुस्तक हा माणसाचा Best Friend असतो.' पण मला कधी हे पटलंच नाही. म्हणजे बघा.. माझ्यासारखा नास्तिक माणूस जो ईश्वराचे अस्तित्व नाकारतो. तो पुस्तकासमोर नतमस्तक होतो. पुस्तकाला चुकून पाय लागला किंवा हातातून पडलं तर लगेच पाया पडतो. यासाठी नाही की मला त्यात देव सापडला पण यासाठी की मला त्यात गुरू सापडला. पुस्तक हा कितीही जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्याच्या जोडीने डायरी, वही, पत्र आणि हो गु...