मनाला का जात नसावी.??


Image result for breakup
           आयुष्यात अशा खूप चुका घडतात जेव्हा दोष कोणाचा हे सिद्ध करण्यात पूर्ण आयुष्य खर्च होतं आणि शेवटी कळतं ती तर कधी चूक नव्हतीच.ती फक्त त्या क्षणासाठी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या परिस्थितीला टाळण्यासाठी केलेली मलमपट्टी होती.पण मूळ गोष्ट पट्टीच्या खालून तशीच ठसठसत राहते. आणि ज्याची त्याला ती वेदना सहन करावीच लागते. त्यामुळे मी किंवा इतर कुणी कितीही सांत्वन केलं तरी ती वेदना काहीकाळानंतर जास्त त्रास देऊ लागते. मानवी जीवनातसुद्धा आठवणी कधी कधी जुन्या जखमेवरची खपली पडावी आणि रक्ताभंबाळ व्हावं तस माणसाला आतून रक्तभंबाळ करून सोडते.
           आज ती साधारण 3 वर्षांनंतर भेटली. आता ती तितकी सुंदर दिसत नव्हती. कदाचित सुंदर आजही आहे पण मी त्या नजरेने तिला बघत नव्हतो. कारण तीच शेवटच वाक्य होतं,"आपण या समाजाचे भाग आहोत.! आपण वेगळं होऊ!" मी आजही तिला दिलेला शब्द शरीराने पाळतो आहे. खरतरं तिची माफी मागायला हवी कारण मी आजही तिला मनातून वेगळं नाही करू शकलो. मी आजही प्रत्येक क्षणाला तिचं नसलेलं अस्तित्व माझ्या अस्तित्वात अनुभवतो. आजही आयुष्यातली प्रत्येक चांगली-वाईट गोष्ट तिला पत्र लिहून कळवतो. हा...! ते पत्र फक्त कपाटाच्या एका कोपऱ्यात पडून आहेत. कसं असतं ना.! माझ्या मनाला जात नाहीये.! पण माझ्या शरीराला समाजाने दिलीये, जात..!! पण तिच्या मनाला जातीचं कुंपण तिने घातलंय. त्यामुळे मी व्यक्त होण तेव्हाही गरजेचं नव्हतं आणि आजही वाटत नाही. कारण शिकून जातीचे दाखले जास्त ठोसपणे तिने दिले होते. 
Image result for breakup and caste
त्यावेळी मला विजय आव्हाड सरांच्या दोन ओळी आठवल्या,
नेमकी शाळेत माझी जात कळली ,
शिक्षणा,तेव्हा तुझी औकात कळली !.
खरचं, शिकून जात ही संकल्पना धूसर व्हावी की व्यापक व्हावी हे मला त्या दिवशीही कळले नाही आणि आजही कळले नाही.
-बुद्धभूषण जाधव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझा आवडता प्राणी - वाघ

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा..

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?