समाजमान्य बलात्कार...
#Lipstick_Under_My_Burkha
पाहिला काल. खूप संवेदनशील विषय मोठ्या पडद्यावर मांडला गेला. आणि बऱ्याच दिवसानंतर अशा विषयाला हात घालण्याचे धाडस एखाद्या दिग्दर्शकाने केले. काल सिनेमापाहून कळाले. इतका विरोध का होता. आधुनिकतेचे वारे कितीही वाहू द्या फक्त माझ्या घराचे छप्पर उडता काम नये. या मानसिकतेचा प्रत्यय यावरून येतो. या सिनेमाला प्रत्येकाने आपल्या दृष्टिकोनातून पाहावा.म्हणून मी या बद्दल काही जास्त बोलणार नाही. तर झालं असं की सिनेमापाहून बाहेर आलो तर सुकन्याची आठवण आली. सुकन्या आमच्यासोबत होती १२वी पर्यंत नंतर मग तिच्यासोबत जो काही contact होता तो फक्त fb, whatsapp च्या माध्यमातून. एकवीस वर्षाची असताना तीचे लग्न झाले.मनासारखा नवरा मिळाला होता तिला(असं तिला आणि आम्हाला वाटलं होतं). पण एक दिवस बातमी आली सुकन्याने आत्महत्या केली.बावीस वर्षाची होती ती फक्त.का संपवले असेल तिने हे आयुष्य?तर त्याचे उत्तर ही तिने सगळ्यांना मरण्याआधी mail केली सुसाईड नोट. आज मला ती नोट सगळ्यांसमोर मांडायची आहे. -
'माझा मेल सगळ्यांना मिळाला आहे.पण तुम्ही वाचाल तो पर्यंत मी या जगात नसेल.खरं तर आयुष्य खूप सुंदर आहे पण मी त्या सुखाला पचवू शकत नाही.कारण मला जे सुख हवंय ते मृगजळ आहे.माझ्या नवऱ्याला मी ते प्रेम नाही देऊ शकत जे त्याला हवंय. त्याच्या प्रेमाची व्याख्या शरीर संबंधाने सुरु होते आणि तिथेच संपते.दारू पिऊन जेव्हा तो संबध ठेवतो तेव्हा मला किळस येते स्वतःची.त्याची ती अश्लील भाषा.तो माझ्या शरीराचे आणि मनाचे लचके तोडतो तेव्हा मला हे आयुष्य नको वाटतं.
मी आईला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण दरवेळी आईने मला हे सांगून चूप केले की तो आता माझा नवरा आहे त्याचा अधिकार आहे तो. खरंच लग्न केले म्हणजे त्याला जबरदस्ती करण्याचा अधिकार मिळतो का? त्या रेड लाईट एरियामधल्या बायका पण स्वतःच्या अटींवर संबंध ठेवतात.पण काय आहे ना! आता माझा रोज होणारा हा बलात्कार समाजमान्य आहे असे म्हणायला हरकत नाही. माझ्या मरणाचा दोष मी कोणालाच देत नाही.कारण मी वास्तव्याला सोडून मृगजळाची अपेक्षा ठेवत होते. -सुकन्या'
या घटनेला वर्ष उलटून गेले पण या सिनेमाच्या निमित्ताने आज सुकन्याचे पत्र पुन्हा एकदा वाचावे वाटलं.आणि विचार करायला भाग पाडले.किती दिवस आपण या जुनाट आणि कुजलेल्या विचारांना धरून चालणार आहे.आता तर वास यायला लागलाय.
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा