रुमाल..
कॉलेजचा पहीला दिवस होता. मन खूप गोंधळलेलं होतं. कारण अचानक एका अशा विश्वात आलो होतो जिथे चूक झाली तर सावरणारे खूप होते पण शाळेसारखं हाताला धरून मार्गदर्शन करणारे गुरुजन नव्हते. माझा तर जास्तच गोंधळ उडाला. एकतर मी मुलांच्या शाळेतून आलेलो त्यामुळे मुलींचे असे सहज वापरणे कधी पाहिलंच नव्हतं.पण हे विश्व म्हणजे स्वप्ननगरी पेक्षा नक्कीचं कमी नव्हतं. त्या पहिल्या दिवशी मी तिला पहिलंवहिलं पाहिलं. पंजाबी ड्रेस घातलेली,सतत ओढणी सावरणारी,गालावर आलेली बट हळूच कानाच्यामागे करणारी. त्या निळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये तिला पाहून असं वाटल कोणी जर मला,'अप्सरा कशी दिसते?' विचारले तर मी नक्कीच तिच्याकडे बोट केले असते.
एके दिवशी ती कॉलेज च्या reading room मध्ये माझ्यासमोर बसली.तिला पहावं की पुस्तकात पहावं हे मला कळेना. माझी ती फजिती तिला एव्हाना कळाली होती.ती पुस्तकात पाहून हसली.मी लाजिरवाणे होऊन पुस्तकात डोके खुपसले. काही वेळाने डोके वर काढले तर ती तिथे नव्हती.माझा चेहरा पडला होता पण दुसऱ्याच क्षणी तिचा रुमाल मला दिसला. आणि एखाद्या मुलाला चॉकोलेट पाहून जसा आनंद होतो तसा आनंद मला झाला. मी तो रुमाल उचला आणि खिशात ठेवला.रोज तो रुमाल हातात घेऊन तिचा स्पर्श अनुभवायचो.
एकदा पावसात भिजलेल्यामुळे तिला सर्दी झाली होती. मी तिला माझा रुमाल दिला होता नाक पुसायला (खरं तर तिच्याकडे रुमाल होता हे मला नंतर कळले आणि तिने हि माझा रुमाल घेतला). एक आठवड्यानंतर मी तिला लाज नसल्याप्रमाणे माझा रुमाल मागायला गेलो. आणि त्यावेळी तिने दिलेले उत्तर ऐकून मला शहारून आले होते.ती मला म्हणाली,'तुला काय वाटलं मी तो रुमाल तुला परत करण्यासाठी घेतला होता?'
मी - तू काय करणार त्या रुमालाच?
ती - तेच जे तू गेल्या वर्षभरापासून माझ्या रुमालासोबत करतोय.!
आणि दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देऊन हसलो.
आज सहज विचार आला मी तर आजही तिचा रुमाल सांभाळून ठेवला आहे.पण तिने सांभाळून ठेवला असेल का तो माझा रुमाल?
-बुद्धभूषण जाधव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा